ब्रिटीश पोस्टमास्तर जनरल सर ह्युबर्ट सॅम्स यांनी १९१४ साली टपाल कर्मचारी कर्जरुपी मायाजालात अडकल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या टपाल कामगारांसाठी '' बॉम्बे पोस्टल को-ऑप सोसायटी लि. ची बॉम्बे जी.पी.ओ. च्या वास्तुत स्थापना केली. सुरुवातीला मुंबई इलाख्या पुरतीच मर्यादित असलेली ही संस्था हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेली आहे. ३४४ सभासद व रु. ८,१२५/- इतक्या भांडवलामध्ये सुरु झालेल्या या संस्थेने आता १३२६९ सभासद व रु. ६२,८२,०४,३९०/-ईतके भाग-भांडवल असा टप्पा गाठला आहे.कित्येक वर्षे संस्थेचा लेखापरीक्षणामधील ''अ'' वर्ग अबाधित आहे.
१९६७ पासून दोन जामीनदार अट पद्धत काढून टाकण्यात आली व हमिनिधी अधिमुल्य पद्धत सुरु करण्यात आली त्यामुळे सभासदांना कर्ज सुरळीतपणे मिळू लागले व नियमित कर्जफेड केलेल्या सभासदांचे उर्वरित कर्ज त्यांच्या मृत्युनंतर माफ करण्यात येऊ लागले. २०१५ पासून ही योजना कर्ज विमा योजना या नावाने सुरु आहे.
१९७०पासून ''बॉम्बे पोस्टल को-ऑप सोसायटी लि.'' हि संस्था ''मुंबई पोस्टल को-ऑप सोसायटी लि''.या नावाने ओळखली जाऊ लागली इंग्रजीतून होणारा कारभार तेव्हापासून मराठीतून होऊ लागला. २०१७ पासून ''मुंबई पोस्टल को-ऑप सोसायटी लि.'' च्या नावात ''मुंबई पोस्टल एम्प्लॉईज को-ऑप क्रे. सोसायटी लि.'' असा बदल झाला आहे. संस्थेने १/७/१९७६ पासून संस्थेचे संस्थापक सर ह्युबर्ट सॅम्स यांच्या स्मरणार्थ ''परस्पर साहाय्य निधी योजना '' सुरु केली. या योजनेद्वारे सेवानिवृत्त सभासदांचे संस्थेशी असलेले दृढ संबंध जपणूक करून निवृत्ती नंतर त्यांच्या सभासदत्वाच्या कालावधीनुसार जादा रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाते.
२००४ पासून संस्थेचे कामकाज संगणकिकृत करण्यात आले तसेच सभासदांना जास्तीत जास्त ऑनलाईन सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येत आहेत.
सभासदांना आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनातून विश्रांतीचा क्षण अनुभवता यावा यासाठी उत्तम पर्याय म्हणजे सह्याद्रीच्या रम्य कुशीत वसलेलं, लोणावळ्यापासून जवळ असलेल्या, मळवली येथे संस्थेचे विश्रामगृह बांधण्यात आले आहे.